पुणे : Gas supply crisis मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्राईल तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस वापरावर काही निर्बंध लागू केले असून, व्यावसायिक पाइपलाइनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या गॅसच्या वापरात सुमारे २० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Gas supply crisis हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंगसह विविध व्यावसायिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी आणि नैसर्गिक वायूच्या वितरणाबाबत काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. वितरकांना घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याची माहिती गॅस वितरकांकडून देण्यात येत आहे. तसेच केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ठिकाणीच व्यावसायिक सिलिंडर पुरवावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
पाइपलाइन गॅस वापर ८० टक्क्यांपर्यंत मर्यादित
व्यावसायिक वापरासाठी पुरविल्या जाणाऱ्या पाइपलाइन गॅसवरही निर्बंध Gas supply crisis लागू करण्यात आले आहेत. गॅस पुरवठादार कंपन्यांनी व्यावसायिक ग्राहकांना मागील सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या ८० टक्क्यांपर्यंतच गॅस वापर ठेवावा, अशी विनंती केली आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना याबाबत संदेश पाठवून गॅस वापर नियंत्रित ठेवण्याचे आवाहन केले आहे. या निर्बंधांचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग उद्योगावर होण्याची शक्यता आहे.
घरगुती गॅस पुरवठा सुरळीत
दरम्यान, पुणे शहर व परिसरात घरगुती पाइपलाइनद्वारे पुरविला जाणारा नैसर्गिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती एमएनजीएलकडून देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा इंधन बाजारातील चढ-उतारांचा सध्या घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी गॅस तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही एमएनजीएलने केले आहे. घरगुती ग्राहकांना नियमितपणे नैसर्गिक गॅस उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक साठा व वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचे कंपनीने सांगितले.
हॉटेल मेन्यूवर होणार परिणाम
गॅस वापरावर मर्यादा आल्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपल्या स्वयंपाक पद्धतीत बदल करावा लागत आहे. काही हॉटेलमध्ये तळलेले पदार्थ, वेळखाऊ डिशेस किंवा मोठ्या प्रमाणात बनविल्या जाणाऱ्या स्पेशल पदार्थांवर तात्पुरती मर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे हॉटेलमधील मेन्यू कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पर्यायी उपायांकडे कल
गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी पर्यायी उपायांचा अवलंब सुरू केला आहे. काही हॉटेलमध्ये डिझेलवर चालणाऱ्या भट्ट्या बसविण्यात आल्या आहेत, तर मोठ्या प्रमाणात अन्न शिजविण्यासाठी इंडक्शन कुकिंगचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाचे आवाहन
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. “केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी आणि नैसर्गिक गॅस वाटपाबाबत काही सूचना जारी केल्या आहेत. व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर काही मर्यादा आहेत; मात्र घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे. सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही नियमित सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
या घडामोडींमुळे आगामी काळात हॉटेल उद्योगासमोर नवीन आव्हाने उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : Pune Municipal Corporation पुणे महापालिकेचे १३ हजार ९९५ कोटींचे मेगा बजेट; रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवांवर भर