जलमित्र पुरस्काराने (Jalmitra Puraskar) डॉ. अजित पटनाईक सन्मानित तर डॉ. मोहन धारियांना लक्षवेधी सन्मान (मरणोत्तर)
पुणे: “देशातील सर्वात मोठी समस्या ही पाणी संवर्धन आहे. जगात पाण्याची भीषण परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर पाणी प्रश्न समजून घेतला गेला पाहिजे. भविष्यातील पिढीसाठी पाणी संवर्धन करणे आवश्यक आहे. पाणी आणि शेती याशिवाय लोक जगू शकणार नाही,” असे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी रेल्वेमंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘जलमित्र” पुरस्कार’ (Jalmitra Puraskar) या वर्षी आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि ओडिशामधील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवृत्त सनदी वनाधिकारी (IFS) डॉ. अजित पटनाईक यांना प्रदान करण्यात आला.
याबरोबरच डॉ. मोहन धारियांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. धारियांना लक्षवेधी सन्मान (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला.
हा सन्मान त्यांचे नातू सागर धारिया आणि वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर यांनी स्वीकारला. यावेळी उपस्थित सर्व श्रोत्यांनी उभे राहून डॉ. धारियांना आणि त्यांच्या कार्याला मानवंदना अर्पण केली.
यावेळी यशदा, पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक व सचिव डॉ. अरूणचंद्र पाठक, सुनील जोशी, अनिल पाटील, राजेंद्र शेलार उपस्थित होते.
Jalmitra Puraskar: पुरस्कार प्रत्येक पर्यावरणप्रेमीचा
डॉ.प्रभू म्हणाले, चिल्का तलाव आशियातील खाऱ्या पाण्याचा मोठा प्रकल्प आहे त्यामुळे स्थलांतरित पक्ष देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी येतात त्यामुळे जैवविविधता समृद्ध होते. राजकारणात देखील सध्या अनेकांचे विविध पक्षात स्थलांतर सुरू आहे. स्थलांतरित पक्षांमुळे स्थानिक जैवविविधता समृद्ध होत असते.
डॉ.पटनाईक सत्काराला उत्तर देताना म्हणाले, हा पुरस्कार (Jalmitra Puraskar) जलाशय संवर्धनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पर्यावरणप्रेमीचा आहे. महाराष्ट्र विकास केंद्र पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. चिल्का सरोवर संवर्धन करण्यासाठी अनेक वर्ष आम्ही काम केले आहे त्याची दखल जगाने देखील घेतली याबद्दल समाधान आहे.
सुनील जोशी म्हणाले, “विविध घटक यांना आपल्याला जोडून घ्यावे लागणार आहे. राज्यात लोणार सरोवर आहे ते आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे आहे पण ते केवळ शाळकरी मुलांच्या सहली पुरते मर्यादित झाले आहे. झपाटलेल्या पद्धतीने काम करून अशा सरोवरांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे पर्यावरणीय वारसा जपला गेला पाहिजे. वनराईचे मोहन धारिया यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष असून त्यांचे पर्यावरणीय काम सर्वांनी पुढे नेले पाहिजे.”
आणखी वाचाः PIFF 2026: ‘ऑस्कर’च्या यादीतील ९ चित्रपट पिफमध्ये पाहण्याची संधी
1 Comment